औद्योगिक क्रांती
श्री स्वप्नील हडपे
औद्योगिक क्रांती म्हणजे काय?
औद्योगिक क्रांती म्हणजे 18 व्या शतकाच्या मध्यापासून ते 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकांतील तो काळ ज्यात वस्तू उत्पादनाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आले.
या काळात बहुतांश उत्पादन प्रक्रिया ज्या पूर्वी मानवी आणि पशु शक्तींच्या आधारे चालायच्या त्यांच्या ऐवजी नव-नवीन कृत्रिम आणि यांत्रिक संसाधनांचा वापर होऊ लागला.
हिची सुरुवात युरोप (विशेष म्हणजे ब्रिटेन) मध्ये झाली आणि नंतर तिचा प्रसार अमेरिकेत झाला.
लोह आणि वस्त्रोद्योग यांना सर्वप्रथम औद्योगिक क्रांतीचा फायदा झाला आणि लोखंड आणि कापड यांचे उत्पादन प्रचंड प्रमाणांत वाढले. नंतर इतर वस्तूंचे पण उत्पादन वाढले.
याचमुळे बरेच मोठे सामाजिक-आर्थिक बदल घडून आले.
औद्योगिक क्रांतीमागची कारणे (औद्योगिक क्रांती का घडून आली?)
आर्थिक आणि राजकीय स्पर्धा:
युरोपात नवीन उदयास येत असलेल्या राष्ट्र-राज्ये (Nation-States) यांची आपापसांत आर्थिक-राजकीय स्पर्धा सुरु झाली.आपली औद्योगिक उत्पादकता आणि उत्पादन वाढवून युरोप आणि जगभरातील बाजारपेठा काबीज करण्याची या राष्ट्र-राज्यांची मनसा होती.
युरोपमधील वैज्ञानिक क्रांती:
पुनर्जागरण (Renaissance) मुळे युरोपीय देशांतील लोकं धार्मिकतेच्या आणि क्रीयाकर्माच्या विळख्यातून बाहेर पडले होते आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण झाला होता.
न्यूटन, डार्विनसारख्या संशोधकांनी वैज्ञानिक संशोधनाला चालना दिली होती.
औद्योगिक क्रांतीसाठी सहाय्यक अशा वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅटने लावला; स्टीफन्सनने रेल्वे इंजिनाचा शोध लावला ज्यामुळे अवजड कच्चा माल कारखान्यापर्यंत आणि उत्पादित वस्तू लांबच्या बाजारपेठांपर्यंत नेणे शक्य झाले.
ब्रिटेनमधील कृषी क्षेत्रात सुधारणा:
ब्रिटेनमध्ये साल 1604 पासून Enclosure Acts पारित करण्यात आले. यांनुसार, सामाजिक मालकीच्या जमिनींचे खासगीकरण करण्यात आले.यामुळे, सधन लोकं सरकारकडून जमिनी विकत घेऊन त्यावर स्वतःच्या नफ्यासाठी शेती करू लागले (पूर्वी सामुहिक शेतीची पद्धत जास्त प्रचलित होती - कमी उत्पादकता आणि सामुहिक नफा).
एकीकडे शेतीची उत्पादकता वाढली, उत्पन्न वाढले तर दुसरीकडे ज्यांच्याकडे शेत-जमिनी नव्हत्या अशा लोकांवर शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ आली.
यातूनच मग ग्रामीण भागांतील बरेच लोकं इतर उदरनिर्वाहच्या शोधात शहरांत जाऊ लागले; पुढे यांचेच औद्योगिक कामगारांत रुपांतर झाले.
भौगोलिक शोध आणि जागतिक व्यापार:
16 व्या शतकापासून युरोपीय देशांकडून केली जाणारे सागरी शोध प्रवासे यशस्वी होऊ लागली; नवीन भूखंडांचा शोध लागू लागला आणि नवे सागरी मार्ग व्यापारासाठी उपयोगात येऊ लागले.
यांमुळे जागतिक व्यापाराला चालना मिळाली.
नवीन बाजारपेठांतील मागण्या पुरविण्यासाठी पण औद्योगिक क्रांतीची गरज भासू लागली.
नवीन वित्तीय संस्था:
17 व्या शतकात युरोपमध्ये वित्तीय क्षेत्रात दोन मोठे गट निर्माण झाले - भांडवलदार आणि वित्तीय संस्था (उदा. बँक ऑफ इंग्लंड - 1694) याच दोन गटांनी औद्योगिक क्रांतीला वित्तीय पाठबळ पुरविले.
कोळसा आणि लोखंड:
ब्रिटेनमध्ये सर्वोत्कृष्ट दर्जाचा कोळसा उपलब्ध होता. यामुळे कोळश्याचा उर्जेचे स्रोत म्हणून उद्योगांत वापर होऊ लागला.लोखंडामुळे मोठ्या मशीनी बनविणे शक्य झाले.
तसेच दूरवर माल घेऊन जाऊ शकणारी जहाजे आणि इंजिनचे डबे बनविण्यासाठी लोखंडाचा उपयोग होऊ लागला.
औद्योगिक क्रांतीचे परिणाम:
I. राजकीय:
वसाहतवाद (Colonialism) - आपल्या उद्योगांसाठी कच्च्या मालाचे खात्रीशीर स्रोत उपलब्ध राहवे आणि आपल्या उत्पादनासाठी खात्रीशीर बाजारपेठ सदैव असावी या विचारांतून युरोपातील औद्योगिक क्रांती झालेल्या देशांनी जगातील इतर औद्योगिक आणि लष्करीदृष्ट्या मागासलेल्या देशांत आपल्या वसाहती (Colonies) स्थापन करायला सुरुवात केली (उदा. भारतात ब्रिटेनच्या इस्ट इंडिया कंपनीने आपली वसाहत स्थापन केली).
यातूनच मग हे मागासलेले देश युरोपीय देशांच्या गुलामीत गेले.
पहिले विश्वयुद्ध (1914-18) - युरोपीय देशांतील जगातील इतर भागांत आणि देशांत आपल्या वसाहती स्थापन करण्याच्या शर्यतीतूनच पुढे पहिल्या विश्वयुद्धासाठीचे पोषक वातावरण तयार झाले.
मजूर/कामगार संघटना आणि चळवळी - आपले हित जोपासण्यासाठी औद्योगिक कामगारांनी आपल्या संघटना आणि संघ तयार केले. यातूनच मग जगाच्या इतिहासात कामगार चळवळी सुरु झाल्या (साल 1900 ला इंग्लंडमध्ये लेबर पार्टीची स्थापना; पुढे हीच पार्टी तेथील एक मुख्य राजकीय पक्ष बनली)
II. आर्थिक:
औद्योगिक उत्पादकता आणि उत्पादनात वाढ - औद्योगिक क्रांतीमुळे औद्योगिक उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाली. औद्योगिक उत्पादन ही वाढले.
यांमुळे औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली.औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली.
शहरांचा विकास - स्थापित शहरांचा विकास झाला आणि नव-नवीन शहरे उदयास आली.ग्रामीण भागांचा तेवड्या झपाट्याने विकास न होऊ शकल्याने खेडी मागे पडली आणि शहरी-ग्रामीण दरी (Urban-Rural Divide) तयार झाली जी पुढे रुंदावत गेली.
वसाहतींत दारिद्य - वसाहतींचे आर्थिक शोषण होत असल्याने तेथे दारिद्य पसरले.
III. सामाजिक:
नवीन सामाजिक गटांचा उदय - सर्वहारा (Proletariat = कामगार) आणि पुंजीपती (Bourgeosis = भांडवलदार). या गटांत नेहमी तणावाचे वातावरण राहून अधूनमधून संघर्षही होऊ लागला.
औद्योगिक कामगारांचे प्रचंड आर्थिक आणि सामाजिक शोषण - शहरी झोपडपट्ट्यांचा उदयही यातूनच झाला. तेथील अस्वच्छ वातावरणामुळे गरीब कामगारांच्या आरोग्याचे प्रश्न तयार झाले.
स्त्रिया आणि बालकांचे शोषण - शहरांतील महागाईचा सामना करण्यासाठी स्त्रिया आणि बालकांवरही पैसे कमविण्याचे बंधन होते. उद्योगांत स्त्रिया आणि बालकांचेही अतोनात शोषण होत होते. प्रदीर्घ कामाची वेळ आणि सुरक्षा यंत्रणांचा अभाव यांमुळे त्यांच्या स्वास्थ्याचे आणि जीवित सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले.
संस्कृतींचा ऱ्हास - वसाहतवादामुळे बऱ्याच लहान संस्कृतींचा ऱ्हास झाला. युरोपीय देशांनी आपल्या वसाहतींत आपली पाश्चात्य संस्कृती राबविली आणि आपल्या वांशिक सर्वश्रेष्ठतेच्या (Racial Superiority) भावनेतून वसाहतींच्या लोकांच्या संस्कृतीला तुच्छ लेखून त्यांचे नुकसान केले. यामुळे बऱ्याच लहान संस्कृत्या, जसे कि, आदिवासी संस्कृती, लोप पावल्या.
सरावासाठी प्रश्न:
Why did the industrial revolution first occur in England? Discuss the quality of life of the people in England during the industrialization. How does it compare with that in India at present? (UPSC-2015; 150 Words, 10 Marks)
क्या कारण था कि औद्योगिक क्रांति सर्वप्रथम इंग्लंड में घटी थी? औद्योगीकरण के दौरान वहाँ के लोगों की जीवन-गुणता पर चर्चा कीजिए। भारत में वर्तमान के जीवन-गुणता के साथ वह किस प्रकार तुलनीय है?